एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता शरद पवार यांनीही बारामतीत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार गटावर निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार?
"पक्ष येतात नवीन काढले जातात मात्र देशांमध्ये असे कधीच घडले नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून वाटत नाही त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहे. त्याचा निकाल लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. चिन्हाची फारशी चिंता करायची नसते. 14 निवडणुका लढलो पाच निवडणुकांमध्ये खून वेगळी होती. बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा आणि घड्याळ अशी निरनिराळी चिन्हे आपण पाहिली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
चिन्ह काढून घेतले म्हणजे संघटना संपत नाही...
"एखाद्या संघटनेचे चिन्ह काढून घेतलं तर त्या संघटनेच्या अस्तित्व संपेल असे कधी होत नसतं. सामान्य माणसाशी संपर्क वाढला पाहिजे त्याला आपण नवीन काय देऊ याच्यावर विचार केला पाहिजे. त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा अंतकरणापासून आभार मानतो," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच "आता कामाला सुरुवात करा आता थांबायची आवश्यकता नाही. लवकरच निवडणुका लागतील कोण उमेदवार असेल ते देखील स्पष्ट होईल. एक संच तयार करून घरोघरी जाऊन लोकांना सांगा चिन्ह लवकरच मिळेल असेही सांगा. आपल्याला अनुकूल वातावरण आहे आणि प्रत्येकाला धीर आणि विश्वास देण्याच्या काम तुम्ही करावे," असेही आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.