परळी वैजनाथ दि १३ (प्रतीनिधी)- पवनराजे अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत आत्महत्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींसह सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांनी आत्महत्या करून सहा दिवसांचा कालावधी लोटला तरीही अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता अखेर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
सविस्तर माहिती अशी की, पवनराजे निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी प्रेमपन्ना नगर मधील फ्लॅटवर ६ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी
गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटना घडली त्यावेळी सावंत यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्या असून त्यामध्ये काही लोकांची नावे असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सदर घटनेस सहा दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरीही मयत सावंत यांच्या घरच्यांनी फिर्याद का दिली नाही किंवा पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही किंवा त्या चिठ्ठ्यांमध्ये दडलय काय याबाबत शहरात चर्चा सुरु आहेत.
आज मयत प्रल्हाद सावंत यांच्या पत्नी जयश्री सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी प्रल्हाद काळे, बँकेचे सचिव गोविंद भरबडे, सचिन भरबडे व सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मानसिक त्रास देऊन सोनपेठ बँकेकडून आलेली रक्कम ४८ लाख रुपये परत करण्यास सांगून संगणमत करून आपले पती प्रल्हाद सावंत यांना मानसिक त्रास व धमक्या दिल्या जात होत्या.