राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.यानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्येही २ जुलै २०२३ ला उभी फुट पडली होती. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात दोन गट पडले.ज्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला. याचबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. ज्याचा निकाल आज लागला आहे. ज्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके लावून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार गट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.