राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अशातच आता लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका एकत्र होऊ शकतात असे मोठे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात उतरला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोरेगावमध्ये जयंत पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी आगामी निवडणूकांबाबत मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
"आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी प्रयत्न करा. लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. ढिल्यात राहू नका. आपल्याकडे फक्त एक महिन्याचा वेळ आहे. एका महिन्यात काय जुगाड जुळणी करायची असेल ती करा. जागरुक राहा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लागल्या तरी आपली तयारी पाहिजे, त्यादृष्टीने कामाला लागा," असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.तसेच "देशात सध्या जातीजातीमध्ये भांडण लावायचं काम चालू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारचे एकमत नाहीये. शशिकांत शिंदे यांना सांगितलं आहे आधी लगीन कोंढाण्याचं. त्यानंतर आम्ही तुमच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी राबायला तयार आहे," अशी मिश्किल टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली.