कल्याण- उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. कायद्याचे रक्षक असलेल्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने हे कृत्य केले आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापले असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात गुंडाराज आहे, गँगवॉर रस्त्यावर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहु फुलेंच्या महाराष्ट्रात गॅगवॉर होत असेल तर दुर्दैवी आहे. हा प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे. ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्त आहे.
महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली- सुप्रिया सुळे
महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हकक मिळवून देतील. दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे. फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का?मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे. महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली आहे.
तिन्ही पक्षात मारामारी होत असून हळूहळू एकमेकांचे मुडदे पडतील- विजय वडेट्टीवार
कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी बिघडवली आहे. राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे , सत्ताधारी आमदार कायदा हातात घेत असतील तर जनता काय करणार? पोलिसांच्या केबीनमध्ये गोळीबार होत असेल तर तो सराईत गुन्हेगार आहे. इतकी दादागिरी वाढली आहे. तिन्ही पक्षांत कोल्डवॉर सुरु आहे त्याची प्रचिती आता येत आहे. तिन्ही पक्षात मारामारी होत असून हळू हळू वाढत जाऊन एकमेकांचे मुडदे पाडतील. हे सर्व भूमाफिया आहे. नुसते पैसे कमावणे हेच या सरकार मध्ये सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.