मुंबई - भाजपा सरकार देशासाठी घातक आहे. त्यामुळे आपला इगो किंवा भाजपा-आरएसएसचं सरकार न येणे यात आमचे प्राधान्य भाजपाचं सरकार न येणे यासाठी आहे. महाविकास आघाडीनं जे पत्र काढले त्यात नाना पटोलेंची सही आहे. नाना पटोलेंना किती अधिकार आहेत हे माहिती नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. आघाडीत बोलणी करण्याचे अधिकार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांना दिलेत. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणाची सही नाही. त्यामुळे अजूनतरी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झालाय हे मानायला मी तयार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किंमत आहे. अद्याप महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेस पक्षाची नाही. काँग्रेस प्रभारींशी माझ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत. मग नाना पटोलेंनी सही कुणाच्या सांगण्यावरून केली माहिती नाही. आरएसएस-भाजपाविरोधात जे आहेत त्यांची एक मोट बांधावी असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.
तसेच जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रभारी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही सही त्या पत्रावर दिसत नाही. अद्याप जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. २ फेब्रुवारीच्या बैठकीला मी, रेखा ठाकूर, धैर्यवान पुंडकर उपस्थित राहू. आम्ही १२-१२ जागांचा फॉर्म्युला मांडला आहे. पण बैठकीत महाविकास आघाडीकडून जागावाटपावर काय होते हे बघू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन, २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने खासगी बाजार समिती कायदा बनवला होता यासारख्या २५ मुद्द्यांवर महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. जर या गोष्टींवर योग्य तोडगा निघाला तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर इंडिया विस्कटली आहे तसं महाविकास आघाडीही तुटू नये ही चिंता आम्ही जाहीर केलीय. २ तारखेच्या बैठकीत आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, त्याचसोबत जागावाटपाबाबत गेल्या अडीच वर्षापासून तुम्ही एकत्रित आहात त्यामुळे तुमचा फॉर्म्युला मांडा. त्यावर आम्ही चर्चा करू असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.