नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनतर अखेर जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री नेमणूक केली जाऊ शकते.
राजीनामा देऊन राजभवनाबाहेर पडलेल्या नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. नितीश कुमार म्हणाले, मी नुकताच माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना सांगितलं आहे की, राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावं. मला महाआघाडी तोडण्याबाबत चारही बाजूंनी सल्ले मिळत होते, त्यानुसार मी आज राजीनामा दिला आणि विद्यमान सरकार विसर्जित केलं आहे.राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यात नितीश कुमार यांनी लिहिलं आहे की, आम्ही महाआघाडीशी (महागठबंधन) नातं तोडलं आहे.