दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत आहे. वाहनांचा भरधाव वेग याला कारणीभूत ठरतोय. असाच एक भीषण अपघात भंडाऱ्यात झालाय.टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय. अफसाना शेख (३५) आणि त्यांचा भाऊ कलीम शेख हे दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने धडक दिली. या घटनेत अफसाना शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर कलीम शेख (४०) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वातावरण चांगलंच तापलं. शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोहचला. मात्र पोलिसांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला.
असा झाला अपघात
टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातून दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहिण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते. दरम्यान या चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. या दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट घासत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख याच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. पायाचा अक्षरशः चुरा झालाय.
हा अपघात झाला तेव्हा चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केलं.