टीम इंडियाचा माजी क्रिकेट कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी अडचणीत आला आहे. त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धोनीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. मानहानीची याचिका उद्या १८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्यासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे.
धोनीचा मित्र आणि माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी गुन्हा दाखल केला आहे. मिहीर म्हणाला की, धोनीने त्याच्याविरोधात वक्तव्य केले होते. धोनीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कायदेशीर तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादीनं धोनीने १५ कोटी रुपयांचा कथित नफा आणि २०१७ मध्ये केलेल्या कराराचा भंग केल्याबद्दल केलेल्या खोट्या आरोपांच्या संदर्भात असल्याचे म्हटले आहे.
मात्र, अलीकडेच धोनीने सुद्धा त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला होता. दोघांनी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या कराराचे पालन केले नाही आणि १५ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा दावा धोनीच्या वकिलाने केला होता.धोनीने स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी अर्का स्पोर्ट्सच्या दोन संचालकांविरुद्ध रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता. धोनीच्या वकिलांनी सांगितले की त्यांनी धोनीच्या वतीने रांचीच्या कोर्टात अर्का स्पोर्ट्स संचालक मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता.