Advertisement

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांचे वाहन उलटले

प्रजापत्र | Tuesday, 16/01/2024
बातमी शेअर करा
 यवतमाळ- नवस फेडण्यासाठी पोहरादेवीकडे निघालेले भाविकांचे वाहन नाल्यात उलटून अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर अन्य १२ प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास बेलगव्हाण गावाजवळ घडला. या घटनेमुळे पुसद परिसरात शोककळा पसरली आहे.
 
 
या अपघातामध्ये ज्योतीबाई नागा चव्हाण (६०), उषा विष्णू राठोड (५०), दोघेही रा. जवाहरनगर धुंदी, पार्वतीबाई रमेश जाधव (५५) रा. वसंतपूर, वसराम देवसिंग चव्हाण (६५) रा. सिंगरवाडी धानोरा, लिलाबाई वसराम चव्हाण (६०) सिंगरवाडी धानोरा, सावित्रीबाई गणेश राठोड (४५) जवाहरनगर धुंदी हे सहा जण ठार झाले आहे. तर जखमींमध्ये राज राहुल चव्हाण (५) रा. सेवानगर, आशा हूलसिंग चव्हाण (५०) रा. सेवानगर, दर्शन संतोष पवार (७) रा. सेवानगर, गणेश राठोड रा. सेवानगर, प्रथमेश अर्जुन राठोड (७) रा. पांढुर्णा, गाडी चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड (२५) यांचा समावेश आहे.
 
 
 
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी पुसद तालुक्यातील नागरिक निघाले होते. पुसद तालुक्यातील जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छीराम राठोड यांच्या घरी आधी सर्वजण जमले. त्यानंतर सकाळी ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास धुंदी येथून ते पोहरादेवीकडे निघाले. एमएच २९-३१७२ क्रमांकाच्या लाल रंगाच्या ॲपे वाहनातून जवळपास १८ जण नवस करण्यासाठी पोहरादेवी येथे जात होते. सदर गाडी ही भरधाव वेगात जात असताना बेलगव्हाणजवळ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ही गाडी नाल्यात पलटी झाली. या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले असून १२ जण जखमी झालेत.
 
 
 
सर्व जखमींवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यातील प्रथमेश अर्जुन राठोड, राज राहुल चव्हाण यांना तातडीने नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आमदार इंद्रनील नाईक यांनी जखमींची व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वना केली.

Advertisement

Advertisement