केज - एका व्यक्तीसोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तुझी बदनामी करीन अशी भीती दाखवून महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरात वास्तव्यास असलेल्या एका ४४ वर्षीय महिलेच्या घरी ४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता अल्का साहेबराव शिंदे ( रा. तांबवा ता. केज ) ही महिला गेली. तिने त्या महिलेस एका व्यक्तीसोबत असलेला तिचा फोटो दाखवून तुम्हा दोघांचे संबंध आहेत. असे म्हणत हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल बदनामी करीन अशी धमकी दिली. तुला सुना, जावई आहेत, असे म्हणत ५० हजार रुपयांची मागणी अल्का शिंदे हिने केली. महिलेने सदर व्यक्ती हा आपला नातेवाईक असून असे घाणेरडे आरोप करू नको असे म्हणाली. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
तर ५० हजार रुपये न दिल्यास तुझ्या मुलाविरुद्ध बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिल्याने महिलेने फोटो हिसकावून घेतला. मात्र तिने अंबाजोगाईच्या बसस्टँडच्या समोरील फोटो स्टुडिओमधून तुम्हा दोघांचे फोटो काढून घेतले असून पुन्हा फोटो काढून घेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत निघून गेली. अशी तक्रार संबंधित महिलेने दिल्यावरून अल्का शिंदे विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात जमादार रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करताहेत.