जळगाव- शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीत ८१ वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अडीच तासांतच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. सकाळी साडेअकरा वाजता पत्नीचे वृध्दकाकाळाने निधन झाले. तर पत्नीच्या निधानाने धक्का बसल्याने अडीच तासानंतर ८६ वर्षीय पतीनेही जगाचा निरोप घेतला. प्रमिलाबाई ग्राम पाटील आणि ग्राम दामू पाटील असे निधन झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी ग्राम दामू पाटील हे पत्नी प्रमिलाबाई यांचा एक मुलगा आणि पाच मुली आणि नातवंड असा परिवार आहे. ग्राम पाटील आणि पत्नी प्रमिलाबाई या दोघांनी शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना मोठं केलं, वाढवलं आणि शिकवलं. एवढंच नव्हे तर शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या पाच मुलींचा विवाह सुध्दा धुमधडाक्यात पार पडला. पाच लेकींचा संसार गुण्यागोविंदाने सुरु आहे.
तर, दुसरीकडे ग्राम पाटील यांचा मुलगा किशोर सराफ व्यवसाय करतो. या व्यवसायात मुलानेही चांगली प्रगती केली आहे. सर्व कसं सुरळीत सुरु असताना, पाटील कुटुंबियांसाठी बुधवार हा दु:खाचा वार ठरला. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रमिलाबाई शालिग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रमिलाबाई यांच्या निधनाने कुटुंबात शोकाचे वातावरण होते. तर, पत्नीच्या जाण्याने शालिग्राम पाटील यांनाही मोठा धक्का बसला होता. पत्नीच्या जाण्याचं दु:ख शालिग्राम हे पचवू शकले नाही आणि पत्नीच्या निधनानंतर अडीच तासानंतर शालिग्राम यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचेही निधन झाले.