कोल्हापूर- हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. संपाचा शाळांच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरु झाला आहे. स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल, असा इशारा दिला आहे.
दिपक केसरकर म्हणाले, स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल . नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कुणीही वागू नये. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने सुरु केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे.ख्रिसमस सुट्ट्यानंतर काही शाळा आज तर काही शाळा उद्या सुरू होत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितले. यासंबंधी स्कूलबस मालकांनी शाळांना त्यासोबतच संबंधित विद्यार्थ्यांना कळविले आहे