रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईत ट्रकचालकांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बेलापूर उरण, सायन पनवेल आणि उरण जेएनपीटी मार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला यात पोलिसांनी मध्यस्थी करत मार्ग मोकळा केला. मात्र ट्रक चालकांच्या आक्रमक आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.
वाहनाने अपघात घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला आहे. यामध्ये ७ लाख रुपयांचा दंड व दहा वर्ष कारावासाची तरतूद आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरलेत. बीडसह आष्टीमध्ये या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करावा, अन्यथा चक्काजामचा इशारा आता वाहनचालकांनी दिला आहे. या मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकांनी दिला आहे.
इंधन तुटवड्याचं संकट
सरकारने बनवलेल्या नव्या अपघात वाहन कायद्याविरोधात टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झाले असून पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक आणि वाहतूकदार आजपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकसह राज्यावर इंधन तुटवड्याचं संकट ओढवलं आहे.