Advertisement

 मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचाही सरकारला इशारा 

प्रजापत्र | Friday, 29/12/2023
बातमी शेअर करा

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजानेही २० जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसीचे हे आंदोलन प्रत्येक तालुका, जिल्हा आणि मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी आज पंढरपुरात केली आहे. 

 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये, तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज २०२४ च्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. 

 

आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपुरात धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे आज पंढरपुरात आले आहेत.'जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईमध्ये आंदोलन आयोजित केले आहे. आम्ही देखील आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २० जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे शेंडगे म्हणाले.

 

 

'सध्या सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखो रुपये वाटप करत आहेत. त्याप्रमाणेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनाही सरकारने आर्थिक मदत द्यावी. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारने मराठा समाजाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ही गंभीर बाब आहे. ओबीसी समाजाच्या अध्यक्षाची व सदस्यांची सरकारने हाकलपट्टी केल्याचा आरोपी प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement