भारत जोडो यात्रेला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी आता भारत न्याय यात्रेची तयारी करत आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार आहे.
काँग्रेस पक्षाची भारत न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राहुल गांधी मणिपूरहून मुंबई असा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पार्टी हायकमांड व्यतिरिक्त सर्व राज्य काँग्रेस नेते देखील या काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
नवीन वर्षात १४ जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे २० मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.
१४ राज्यांतून जाणार भारत न्याय यात्रा
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, भारत न्याय यात्रा ६,२०० किलोमीटरची असेल. मणिपूरपासून सुरुवात झाल्यानंतर भारत न्याय यात्रा नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून जाईल. शेवटी भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचेल. या यात्रेचा समारोप २० मार्च रोजी मुंबईत होणार आहे.