महाविकास आघाडी एकत्र राहील आम्ही एकत्रित निवडणूक लढवू. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सन्मानाने सामील करुन घेऊ. सगळ्यांनी एकत्र यावे ही प्रकाश आंबेडकर यांची भावना आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आहे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
पुढे राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे योगदान काय आहे, असे विचारणाऱ्यांनी तुमचे योगदान काय आहे ते पहिला सांगा? असा सवाल त्यांनी केला. अयोध्या आंदोलन सुरू असताना, स्वतःला योद्धा समजणारे पळून गेले. तिथून आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे पुढे आले आणि म्हणाले मला अभिमान वाटतो त्या शिवसैनिकांचा ज्यांनी राम मंदिरासाठी हे काम केले आहे.” असेही ते म्हणाले.
आम्ही दोघेच २४-२४ जागा लढू : अॅड. प्रकाश आंबेडकर
उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे की शिवसेनेचे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पवार गटाशी बिनसल्यास उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित लोकसभेच्या ४८ पैकी प्रत्येकी २४ – २४ जागा लढेल, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.