मुंबई- राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गूड न्यूज जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास १३ हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करुन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीत या मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करतानाच १३ हजार ११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.
राज्य मंत्रीमंडळाची मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १३,०११ मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत. त्याचबरोबर १३,०११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. याशिवाय मुख्यसेविका पर्यवेक्षिका यांची ५२० पदे निर्माण होणार असून १३,०११ मिनी अंगणवाड्या नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता देण्यात आली आहे. परिणामी लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.