राजस्थानमध्ये भाजपचा गुजरात पॅटर्न पाहायला मिळाला. भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपने ही घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच दिया कुमारी आणि प्रेम चंद बैरवा यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली.
भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आणि भाजपचे सरचिटणीस आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या आमदारांनी त्यांना आपला नेता मानले. निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांची भेट घेतली होती.
राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती. मध्य प्रदेशातील मोहन यादव यांच्या प्रमाणे भाजप मुख्यमंत्री म्हणून नव्या नावाची घोषणा करू शकते, असे बोलले जात होते. त्यानुसार भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.