केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झालेला असताना, आता स्वतः शरद पवार या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सोमवारी रास्ता रोको करणार आहे.
वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्याबरोबरच देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मार्च २०२४ पर्यंत ही बंदी असणार आहे. मात्र, या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पक्षाकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.