रायगड - जयंत पाटलांनी मला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला, आता अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष करावं, हे म्हणजे जयंत पाटलांनी घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून राज्याचं राजकारण त्यामुळे ढवळून निघाल्याचं दिसून येतंय.
काय म्हणाले प्रकाश सोळंके?
अध्यक्षपदाचा शब्द मला जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी दिला होता. जयंत पाटील यांनी तो पाळला नाही. केवळ घरी बोलवायचं, चहा आणि नाश्ता खाऊ घालवायचा, मात्र निवडीच्या बाबत काहीच नाही. मी आमदारकीचा राजीनामा देऊन घरी बसणार होतो. मग माझा राजीनामा थांबवला कशाला.
आता आम्ही सत्तेत सहभागी झाल्यावर ते म्हणत आहेत की आता अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष करावं. म्हणजे याचा अर्थ असा जयंत पाटील, तुम्ही घाण करणार आणि अजित पवार यांनी ती साफ करायची हे योग्य नव्हे. सत्तेत सहभागी झालो याला हे कारण नाही त्याची वेगळी कारण आहेत
शरद पवार यांना अध्यक्षपदाबाबत मी दोनदा भेटलो. त्यांनी मला शब्द देखील दिला. एक वेळ अशी आली की त्यांनी सोबत पत्र घेऊन जा, दोन-तीन दिवस मुंबई थांब असं सांगितलं, मात्र मला पत्र मिळालं नाही.