जळगाव - जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा आमचं सरकार धावून गेलं, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तांत्रिक गोष्टींमध्ये सरकारने अडकु नये. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळायला पाहिजे, अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळावी. पीक विमा कंपन्या विमा द्यायला टाळत आहेत. राज्यातील हे सरकार केवळ घोषणा करते पण मदत मिळत नाही, आजवर सरकारचा हा वाईट अनुभव आला आहे. शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी म्हणून आक्रोश मोर्चा काढला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांना कापसाला दर मिळावा, किमान मागच्या वर्षाचा दर कपाशीला द्यावा. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात येत असून यानिमित्ताने जळगावात आले असता जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
सरकारने केवळ इव्हेन्ट व घोषणा केल्या
मागच्या वर्षी जो भाव कापसाला मिळाला होता, तो भाव यंदा देखील मिळायला पाहिजे. आज शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. त्यात कापूस उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सरकारने इव्हेंट आणि घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी आज राष्ट्रवादी जन आक्रोश मोर्चा काढत आहे. सरकारने चढ्या दराने कापूस खरेदी करावी, निर्यात करायला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारने भूमिका घ्यायला हवी. सरकारने कापसाला अनुदान दिलं पाहिजे; असेही ते यावेळी बोलले.