मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे छगन भुजबळ असतील, त्या कोणत्याही मंचावर उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. मात्र, आता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळांसोबत हजेरी लावणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली. हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. मी भूमिका जाहीर केल्यानंतर मला अनेक फोन आले आणि मेळाव्याचा जाण्याचा आग्रह केला. लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीच्या मेळाव्याला मी जातोय, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.