राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले असून ज्याचा फटका राजकीय कार्यक्रमांना बसत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापुजेला जोरदार विरोध दर्शवला असून पंढरपुरात येऊ न देण्याचा इशारा दिला आहे. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुजेला विरोध करण्याची आपली संस्कृती नसल्याचे म्हणत अडथळा न आणण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही..." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले .