राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधराशे कोटीचा कोको कोला उद्योग येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोटे एमआयडीसीमध्ये लवकरच कोको कोलाचा 1500 कोटींचा उद्योग सुरु होणार आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या उद्योगाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता असल्याचे उदय सामंत म्हणाले. तसेच वर्षभरामध्ये अनेक कंपन्या कोकणामध्ये उद्योगासाठी आलेल्या असतील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.