जालना - मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी धुळे -सोलापूर महामार्गावर आज शेतक-यांनी रास्ता रोको आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे काही काळ वाहतुकीचा खाेळंबा झाला. जायकवाडी धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी जायकवाडीली साेडले जाणार हाेते. परंतु नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी त्यास विराेध दर्शविला.त्यातच काही शेतक-यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी साेडलेले गेले नाही. परिणामी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.आज (शनिवार) रोजी अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. भाजपचे नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जायकवाडीत ऊर्ध्व भागातील धरणांमधून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी तातडीनं सोडावं अन्यथा सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू असा इशारा सतीश घाटगे यांनी दिला. दरम्यान रास्ताे राेका प्रकरणी पाेलीसांनी सतीश घाडगे यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले .