अंबाजोगाई - तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे.