Advertisement

परळीत मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा

प्रजापत्र | Tuesday, 10/10/2023
बातमी शेअर करा

परळी - परळी विधानसभा मतदार संघातील सकल मातंग समाजाच्या वतीने परळीत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सहभागी विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे येऊन उपविभागीय कार्यालय येथे धडकला. लाल झेंडे हाती घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनी, महिला आणि समाज बांधवांच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले. 

 

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला विविध प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने सरकारने तात्काळ खाजगीकरण थांबवावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद शाळा दत्तक योजनेखाली खाजगीकरण करण्याचे ठरवले आहे. तो जी आर तात्काळ मागे घेण्यात यावा, साहित्य रत्न आण्णाभाऊ यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक वाटेगांव या ठिकाणी उभारण्यात यावे, ऊसतोड कामगारांना प्रति टनाला ५०० रुपये भाव देण्यात यावा, निराधार व श्रावणबाळ योजनेचे प्रलंबीत असलेले प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे व त्यांना प्रति महिना ३ हजार रुपये वेतन देण्यात यावे, वाढत्या महागाई नुसार पंतप्रधान घरकूल आवास योजना व रमाई आवास योजनाच्या प्रति घरकुलाला ५ लाख रुपये देण्यात यावे, ऊस तोडणी कारखान्याला जाणाऱ्या प्रत्येक कुटूंबाला सहा महिण्याचे रेशन त्यांना एकाच वेळी देण्यात यावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा आम्ही सरकारला मतदारसंघात फिरकू देणार नाहीत असा इशारा आंदोलनात सहभागी मातंग समाज बांधवांनी दिला आहे. या आक्रोश मोर्चात मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
 

Advertisement

Advertisement