अंबाजोगाई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालताना खासगी लक्झरी बस पलटी झाली. हा अपघात आज रविवारी (दि.०८) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, सदरील बस एका कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
गजराज ट्रॅव्हलची लक्झरी बस (एमएच २४ एबी ८८५५) पुण्याहून अंबाजोगाईकडे येत होती. भरधाव वेगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. यावेळी बसमध्ये ४ ते ५ प्रवाशी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही. दरम्यान, बस पलटी होत असताना ती एका आर्टिगा कारवर पडल्याने कारचे (एमएच १४ एचडी ८८१४) मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कारचालक दूध घेण्यासाठी गाडीच्या बाहेर आलेला असल्याने तो बचावला. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तातडीने बोलावून घेतले. दरम्यान, क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बस चौकातून हलवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांचे प्रयत्न सुरू आहेत.