ज्या गणेशाला संकटमोचक मानले जाते त्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत लेजरचा वापर झाल्यामुळे कितीतरी लोकांची दृष्टी गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. अगदी गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजेचा अतिवापर झाल्याने काही तरूणांचा मृत्यु झाला होता. मात्र या कुठल्याच घटनेने उत्सवप्रिय असलेल्या सरकारला काहीच फरक पडत नाही. लोक मेले तरी चालतील पण कठोर निर्णय घ्यायचेच नाहीत असेच सरकारचे धोरण आहे आणि समाजाला धार्मीकता आणि धांडगधिंगा यातील फरक वेगळा करण्याची दृष्टी यायला तयार नाही. यात फरफट मात्र सामान्यांची होत आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात नेत्ररोग तज्ञांना नवेच रूग्ण तपासावे लागत आहे. रूग्णांच्या डोळ्यावर लेझरमुळे जळण्याचे प्रकार समोर आले आहेत. लेझरच्या किरणांनी दृष्टीपटल जळाल्यामुळे नजर कमजोर झाल्याचे रूग्ण अचानक वाढले आहेत. या रूग्णांमध्ये कोणती एक गोष्ट समान असेल तर ती म्हणजे यातील बहूतांश रूग्णांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या तालावर चालणार्या लेजर शो अनुभवला होता. डिजेच्या तालावर एकतर कानाचे पडदे फाटतील असा आवाज आणि त्यानंतर आता थेट दृष्टीपटेल जाळेल इतक्या तीव्रतेचे लेजर किरण केवळ उत्सवाच्या नावावर वापरले जाणार असतील तर गणेश उत्सवाचा खरा अर्थ समाजाला कळला आहे का? हाच प्रश्न आहे.
गणेशोत्सव हा धार्मिकतेपलिकडे जावून सामाजिकतेकडे घेवून जाणारा उत्सव असल्याची भूमिका ‘प्रजापत्र’ने यापूर्वीच्या काही अग्रलेखांमधून अग्रहीपणे मांडली होती. या उत्सवाला उत्साह असतो तरी या उत्साहाला किमान सामाजिकतेची आणि व्यापक समाजहिताची काही बंधने असली पाहीजेत. प्रत्येक वेळी केवळ हिंदूच्याच सणाला विरोध का? असली उपटसुंबासारखी कारणे देण्यापेक्षा आपल्या कृतीचा समाजावर काय परिणाम होतो याचा विचार गणेश मंडळांनी करायला हवा आणि मंडळे तसा विचार करणार नसतील तर सरकारने कठोर निर्णय घ्यायला हवेत अशी भूमिका असणे गरजेचे आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीतील डिजेच्या आवाजामुळे एका तरूण पत्रकाराला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वर्षी देखील सांगली जिल्ह्यात डिजेमुळे दोघांचे बळी गेले. इतके झाल्यानंतर तरी सरकारमध्ये बसलेल्यांनी समाजाच्या हिताची चाढ म्हणून डिजेचा धांगडधिंगा बंद करण्यासाठी पाऊले उचलायला हवी होती. डिजे ही काही आपली संस्कृती नाही किंवा डिजे हा गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग देखील नाही. डिजेलाच कवटाळून बसावे असा डिजेचा गणेशोत्सवाशी कोणता परंपरागत संबंधही नाही. तरी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना काय वाटेल यातून सरकार कठोर भूमिका घेत नाही. आता तर डिजेच्या जोडीला जीव घेणे लेजर शो आले. या लेजर शो ने अनेकांची दृष्टीपटले जाळली आहेत पण या पलिकडे जावून मुळातच सरकारचीच सामाजिकतेची नजर जाळून टाकली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. उत्सवासाठी उत्साह महत्वाचा असतो का धांगडधिंगा आणि कोणाच्याही क्षणीक आनंदासाठी समाजाच्या आरोग्यासाठीची तडजोड सहन केली जाणार नाही हा ठामपणा सरकारमध्ये बसलेले उत्सवप्रिय पुढारी घ्यायला तयार नाहीत. त्याची किंमत मात्र सामान्यांना चुकवावी लागते. उत्सवात समाजाच्या आरोग्याचा विचार करण्याची दृष्टी समाजाला आणि सरकारला देखील कधी येणार आहे.