बीड - जुनी पेन्शन लागु करा या मुद्द्यावरून शिक्षक आक्रमक झाले आहेत. आज (दि.२) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शिक्षकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. छत्रपती संभाजी राजे क्रिडांगणावरून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता.
जुनी पेन्शन योजना लागु करा, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे तात्काळ बंद करा, शिक्षणाचे व नौकाऱ्यांचे खाजगीकरण थांबवा, कंत्राटी शिक्षक भरती करू नका, समुह शाळेच्या नावाखाली २० पटसंख्येच्या शाळा बंद करू नका, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा व इतर मागण्याच्या अनुषंगाने शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोर्चा काढण्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर बीडमध्ये आज शिक्षक संघाने मोर्चा काढला. या मोर्चाला महाराष्ट्र शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक सेना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, गुरुजी विचारमंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड शिक्षक व कर्मचारी संघटना यांनी पाठींबा दिल्याने जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.