Advertisement

'हर हर महादेवच्या" जयघोषाने परिसर दुमदुमला

प्रजापत्र | Monday, 11/09/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीत चौथा श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. शेवटच्या श्रावणी सोमवार असल्याने देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हरहर महादेवचा गजर करत भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने  दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी एकादशी असल्याने दर्शन रांगेत भाविकांची गर्दी होती. सोमवारी सकाळी त्यात आणखी वाढ झाली आहे. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दुपारी २:३० वाजेपर्यंत साधारणपणे ३५ हजार भाविक भक्तांनी दर्शन घेतले आहे. दर्शन नियोजनासाठी वैद्यनाथ देवल कमिटीचे प्रा.बाबासाहेब देशमुख हे स्वतः लक्ष देऊन होते.
श्रावण सोमवारीनिमित्त वैद्यनाथ मंदीरात नाथ प्रतिष्ठानकडून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महादेवाला बेल अधिक प्रिय असल्याने आज बेल आणि फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेल घेण्याण्यासाठी मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर गर्दी झालेली दिसून आली. सोमवार पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

Advertisement

Advertisement