बीड: डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी मधील प्रवेशावरुन जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या चुलत्या पुतण्या मधील राजकीय भूमिका वेगवेगळ्या झाल्या आहेत. तरिही डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाच्या जाहिरातींमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो वापरण्यात आला होता. यावर आक्षेप घेत जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली आहे. आपला फोटो वापरुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मी कालच जाहीर केली आहे,तरीही माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काल आपण काकांचा आशीर्वाद घेऊनच पक्षप्रवेश करित असल्याचे म्हटले होते, त्याला आता जयदत्त क्षीरसागर यांनी छेद दिला आहे.