मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त ३३.१८ टक्के पाणीसाठा राहिला आहे. तर मराठवाडयातील 11 मोठ्या धरणात फक्त 42 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. अगोदरच मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष मोठा आहे, त्यातच जे सिंचन प्रकल्प आहेत, त्यातही यावर्षी पाणीसाठा झालेला नाही. बीडसह संपूर्ण मराठवाड्यात आगामी काळातील परिस्थिती चिंताजनक असेल असे चित्र आहे, त्यामुळे आतापासूनच केवळ नियोजन नव्हे तर त्याची कठोर अंमलबजावणी अपेक्षित आहे
अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा कमी असेल असे अंदाज यावर्षी खूप पूर्वीच वर्तविण्यात आले होते. काही खाजगी अभ्यासकांनी चांगल्या पावसाचे अंदाज व्यक्त केले असले तरी निसर्गात होणारे बदल, अलनिनो चा प्रभाव आणि त्यानंतर आलेले वादळ , यासार्याचा एकत्रित परिणाम आता किमान मराठवाड्याला तरी दिसत आहे. जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिन्याचा देखील १ आठवडा संपलेला असताना मराठवाडा विभागात पावसाच्या तुटीची टक्केवारी आता ६०% इतकी झाली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात तर ही तूट ६५ टक्क्यांवर आहे. बरे जो पाऊस झाला आहे तो देखील समाधानकारक म्हणजे पाणी साठा होण्यासारखा झालेला नाही. बहुतांश ठिकाणी भूरभूर पावसाचेच चित्र पाहायला मिळाले आहे. जुलै महिना तरी चांगल्या पावसाचा मानला जातो, या पावसात सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा बऱ्यापैकी झालेला असतो. यावर्षी मात्र अजूनही बहुतांश सिंचन प्रकल्प मृत साठ्याच्या बाहेर आलेले नाहीत.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याचे प्रकल्प आता कोरडे पडू लागले आहेत. तर काही ठिकाणी धरणात अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात देखील आता परिस्थिती चिंता वाढविणारी ठरत आहे. कारण विभागातील ११ मोठ्या धरणात फक्त ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता फक्त दोन महिने पावसाळा शिल्लक राहिला आहे. चिंताजनक म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त ३३.१८ टक्के पाणीसाठा राहिला आहे. नांदेड आणि हिंगोलीकडचे विष्णुपुरी , येलदरी , पैनगंगा प्रकल्प किमान समाधानकारक अवस्थेत तरी आहेत, मात्र जायकवाडी, सिद्धेश्वर, निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आदी प्रकल्प अजूनही तहानलेले आहेत तर सीना कोळगाव प्रकल्पात आजही पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आहे. याचमुळे पुढील काळात पाण्याचे नियोजन कसे करायचे हा मोठा प्रश्न असणार आहे. मराठवाडा विभागातील मोठ्या प्रकल्पांची अवस्था अशी असून मध्यम प्रकल्पांची स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे आता पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच प्रशासनाच्या नाकीनऊ येतील अशी परिस्थिती आहे.
महानगरे, प्रमुख शहरे आदींच्या पाणीपुरवठा योजना या प्रामुख्याने मोठ्या प्रकल्पांमधून आहेत, तर तालुकास्तरावरची गावे आणि ग्रामीण भागातील पाणी योजना मध्यम प्रकल्पांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला नाही तर पाणी योजनांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच आत्ता सध्या जे पाणी शिल्लक आहे त्याचे नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची इच्छाशक्ती प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दाखवावी लागणार आहे. हे करता आले तरच पुढच्या काळात किमान पिण्याचे पाणी तरी उपलब्ध करून देता येईल.
अर्थात अजूनही पावसाच्या आशा संपल्या आहेत असे नाही, आपल्याकडे अनेक भागात परतीचा पाऊस चांगला होतो, त्याचा सिंचन प्रकल्पांना फायदा होत असतो, पण उद्याच्या आशेवर आज हातचे संपवून चालणार नाही , त्यासाठीचे नियोजन हवे आहे.