स्वतःच्या राजकीय भूमिकांबद्दल कायम संशय निर्माण करणे हा शरद पवारांचा स्वभाव आहे. पवारांची कोणतीच राजकीय कृती कधीच निसंदिग्ध अशी नसते. आता नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा आपला नाईलाज आहे असे शरद पवार म्हणत असले तरी यामुळे राज्यात अगोदरच जो राजकीय संभ्रम निर्माण झालेला आहे, त्यात वाढच होणार आहे. या साऱ्याच्या पलीकडे जाऊन शरद पवार यांची राजकीय विश्वासार्हता जी पणाला लागलेली आहे, त्याचे काय? का शरद पवारांनाच हा राजकीय गोंधळ आणखी काही काळ वाढवायचा आहे ?
राजकारणात कोणतीच गोष्ट अंतिम सत्य नसते आणि कोणतीच परिस्थिती सदासर्वदा कायम राहत नसते, जसे परिस्थितीचे तसेच राजकीय संबंधांचे. कोणाचे कोणाशी असलेले राजकीय संबंध कधी बिघडतील किंवा सुधारतील हे सांगता येणे अवघड असते आणि सध्याच्या काळात तर ते केवळ अशक्य म्हणावे असेच आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींना दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी शरद पवार लावणार असलेली हजेरी सध्या राजकीय चर्चेचा विषय झालेली आहे.
नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याचा निर्णय संबंधित ट्रस्टने घेतल्यावर मोदींनी या कार्यक्रमासाठी वेळ द्यावी अशी विनंती स्वतः शरद पवारांनी केली होती हे जरी वास्तव असले तरी त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राजकारणात निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि इतरवेळी सर्वचे संबंध सौहार्दाचे असावेत अशी भूमिका शरद पवार यांनी यापूर्वी अनेकदा मांडली आहे हे जरी खरे असले तरी राजकीय परिस्थितीनुसार काही गोष्टींचे मूल्यमापन केले जात असते. शरद पवारांचा राजकीय भाव भलेही फार उदात्त आणि विशाल असेल, पण सामान्यांचे आकलन इतके विशाल नसते, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर किंवा अजित पवारांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर एकीकडे शरद पवार हे अजित पवारांना 'आपल्या वाटा वेगळ्या आहेत' असे सांगतात आणि दुसरीकडे मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल मात्र ठाम असतात. शरद पवार यांच्या लेखी हा प्रकार राजकीय उदारतेचा म्हणा किंवा आणखीच समर्थन करायचे तर राजकीय सहिष्णुतेचा असेलही, मात्र ज्यावेळी नरेंद्र मोदी काय किंवा त्यांचा भाजप काय, सारी राजकीय सहिष्णुता बाजूला ठेवून तोडफोडीचे राजकारण करीत असेल, किंबहुना लोकशाहीमधील बहुपक्षीय व्यवस्थेलाच चूड लावू पाहत असेल त्यावेळी खरेतर त्यांच्याशी कोणतेच राजकीय संबंध येऊ नयेत हे पहिले जाणे अपेक्षित असते. आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांची आणि राज्यातील पुरोगामी विचारधारेच्या लोकांची तीच भूमिका असताना शरद पवार मात्र मोदींचा कार्यक्रम टाळायचा नाही असे म्हणतात, हे सामान्यांच्या पचनी पडणारे नाही.
असेही शरद पवार यांना स्वतःलाच राजकीय भूमिकांबाबत गोंधळ निर्माण करणे आवडते असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. अनेक राजकीय विषयांवर वादळ निर्माण झालेले असतानाही शरद पवार त्यावर दीर्घकाळ मौन बाळगतात आणि संशयकल्लोळ निर्माण होऊ देतात आणि काही काळानंतर आपल्या भूमिकेचे सोयीस्कर अर्थ सांगतात हे आजपर्यंत राज्यातील जनतेने अनेकदा अनुभवले आहे. मुळात राजकीय दृष्ट्या उपेक्षित अशा तत्कालीन जनसंघाला (जनता पक्षाला ) राजकीय चळवळीत स्थान देण्याचे काम महाराष्ट्रात पहिल्यांदा शरद पवार यांनीच केले. तेव्हापासूनच शरद पवारांच्या राजकारणाला कोणीच वर्ज्य नाही असा संदेश गेलेला आहेच. शरद पवारांच्या गुजरात आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका लढविण्याच्या भूमिकांचा फायदा कोणाला झाला हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच शरद पवार यांचे राजकारण नेहमीच कात्रजचा घाट दाखविणारे असते असे सांगितले जाते. मात्र यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर देखील मोठे प्रश्नचिन्ह लागत आले आहे, आताही लागत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले ते शरद पवारांच्या अनुमतीनेच असे जे अजित पवार समर्थक अजूनही सांगत असतात, त्याला बळ देण्याची कृती शरद पवार आणि मोदींच्या एकत्र येण्याने होणार नाही का? सामान्य माणूस तर तसाच विचार करणार ना, ज्या मोदींच्या धोरणांचा विरोध करायचा, त्यांच्याच मांडीला मांडी लावून शरद पवार बसणार असतील तर विरोधी पक्षांनी याचा अर्थ काय घ्यायचा? मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा आपला नाईलाज असल्याचे शरद पवार म्हणाल्याचा दावा कुमार सप्तर्षी यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांचे हे सारे राजकारण नाईलाजाने असले तरी महाराष्ट्राला मात्र गोंधळात टाकणारे आहे. अगोदरच देशभर विरोधीपक्षांच्या एकीमध्ये अनेक अडथळे असतानाच शरद पवारांचे हे 'नरो वा कुंजरो वा ' राजकारण गोंधळ वाढविणारे आहे.