Advertisement

विधान परिषदेसाठी सोनवणे समर्थकांनी कसली कंबर

प्रजापत्र | Tuesday, 01/08/2023
बातमी शेअर करा

बीड दि.31 (प्रतिनिधी): राज्य विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा येडेश्‍वरी उद्योग समुहाचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे समर्थक देखील कामाला लागले आहेत. बजरंग सोनवणेंना विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी ‘एक मेल शेतकरी पुत्रासाठी’ हे अभियान सुरू केले असून राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांना हे मेल पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य विधान परिषदेच्या राज्यपाल नियूक्त जागांवर नियूक्ती मिळण्यासाठी अनेकजण प्रयत्नात आहेत. त्यासंदर्भाने वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी लॉबिंग सुरू केली असतांनाच बीडमध्ये येडेश्‍वरी उद्योग समुहाचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत. येडेश्‍वरी समुहाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणणार्‍या बजरंग सोनवणे यांना विधान परिषदेवर घ्यावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्येकाने एक ई-मेल करावा असे सांगणारे ‘एक मेल शेतकरी पुत्रासाठी’ अभियान त्यांच्या समर्थकांकडून राबविले जात आहे.

 

 

असा आहे ई-मेल

महोदय,

शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांनी येडेश्‍वरी साखर कारखाना युनिट 1 व 2 च्यामाध्यमातून बीड, उस्मानाबाद (धाराशिव), सोलापूर जिल्ह्यात ऊसाला सर्वोत्तम भाव देवून हजारो-लाखो कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. या तीन जिल्ह्यात बजरंग सोनवणे यांचा दांडगा जनसंपर्क व लोकप्रियता आहे. सरपंच ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास केलेल्या सामान्य कुटुंबातील शेतकरीपुत्राला विधानपरिषदेवर संधी मिळावी अशी विनंती मी व माझ्या परिसरातील शेतकरी बांधव करत आहेत.

आपलाच

शेतकरी बंधू

Advertisement

Advertisement