Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - खोदणार का गुटख्याची पाळेमुळे?

प्रजापत्र | Monday, 31/07/2023
बातमी शेअर करा

गुटख्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत गुटखा माफियांची मजल गेल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले. पोलिसांनी नंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करून गुटखा जप्त केला असला तरी गुटखा माफियांमध्ये इतका माजोरेपणा कशामुळे आला? या प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्या गुटखा माफियावर हा काही पहिलाच गुन्हा देखील नाही, अगदी कोठडीत असतानाही त्याचे धंदे बंद नव्हते असे सांगतात, हे बळ त्याला व्यवस्थेच्या सहकार्याशिवाय मिळालेले नाही हे तर सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे, मग असल्या माफियांना बळ देणारांविरुद्ध देखील काही कारवाई होणार का? पोलिसांना म्हणा किंवा सर्व व्यवस्थेतीलच म्हणा, खरोखर गुटख्याची पाळे'मुळे' आणि माफियांचे आधारस्तंभ शोधायचे आहेत का?

 

बीडमध्ये गुटख्याची कारवाई करायला गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करताना तहसीलदार किंवा महसूलच्या पथकावर हल्ले झालेले आहेतच. अगदी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला हूल देण्याची मुजोरी वाळू माफियांनी दाखविलेली आहेच. आता गुटखा माफिया देखील त्याच मार्गाने जात आहेत, म्हणजे कायदा आमचे कांहीच बिघडवू शकत नाही इतका दांडगा विश्वास या सर्वच माफियांना आहे. हा विश्वास म्हणा किंवा माजोरेपणा माफियांमध्ये येतो कोठून? केवळ एक दोघांवर गुन्हे दाखल करून हा माजोरेपणा थांबणार आहे का?

 

मुळात गुटख्यावरील कारवाया असतील वा वाळू तस्करीवरील कारवाया, या कारवाया कशा होतात, याबद्दल जिल्ह्यात फार चांगले बोलले जात नाही. वाळू माफिया कोण आहेत किंवा गुटख्याच्या धंद्यात कोण आकंठ बुडालेला आहे याची 'कुंडली' पोलीस किंवा इतर यंत्रणांकडे नाही असेही नाही. पण सारे काही माहिती असतानाही पोलीस नेहमीच कारवाई करतात असे नाही. पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जो गुटखा पकडला आणि त्या प्रकरणात ज्या महारुद्र मुळेवर गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो बिनदिक्कतपणे आपला धंदा चालवित होता, मात्र स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नव्हती. विशेष पथकाच्या कारवाईनंतर हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर मुळेंच्या विरोधात आणखी २-३ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इतरवेळी हातभट्टीची दारु विकली म्हणून एखाद्याच्या विरोधात एमपीडीए सारखी कारवाई प्रस्तावित करणारे पोलीस खाते महारुद्र मुळे काय किंवा इतर गुटखा माफिया काय, त्यांची सारी माहिती आणि 'कुंडली' पोलिसांकडे असतानाही त्यांच्या धंद्यांवर 'चादर' टाकण्यातच धन्यता किंवा 'हित' मानत आली आहेत. मग जर 'सय्या भये कोतवाल' सारखे चित्र असेल तर असल्या माफियांची मुजोरी वाढणार नाही तर काय होईल?

 

तस्करी वाळूची असेल, गुटख्याची असेल किंवा आणि कोणतेही दोन नंबरचे म्हणवले जाणारे धंदे असतील, ते राजकीय आशिर्वादाशिवाय चालत नाहीत. यापूर्वी अशा काही प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तींची नावे समोर आलेली आहेतच. राजकीय आशीर्वाद आणि व्यवस्थेतल्या खालपासून वरपर्यंतच्या लोकांशी असलेली हातमिळवणी यातूनच मग असले सारे धंदे जोरात चालतात आणि धंदे करणारे माफिया पुन्हा उजळ माथ्याने फिरत असतात. एकदा का वरपर्यंत हात पोहचलेले असतील की मग खालच्या कर्मचाऱ्यांना विचारण्याची गरज काय अशी मानसिकता देखील जिल्ह्यात असल्या धंदेवाल्यांमध्ये वाढलेली आहे. खरोखरच जर सर्व यंत्रणा, त्यात महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, आरटीओ आणि इतर यंत्रणा यांनी ठरवलेच तर वाळू किंवा गुटखा तस्करी रोखणे काही मिनिटाचा खेळ आहे, मात्र असे होताना दिसत नाही . या माफियांना टीप देणारे, लोकेशन देणारे किंवा 'वातावरण सध्या गरम आहे, कांहीं दिवस शांत राहा' असा सल्ला देणारे कोण आहेत? यात बऱ्यापैकी व्यवस्थेतलेच लोक आहेत हे लपून राहिलेले नाही, ते सर्वज्ञात असलेले एक उघड गुपित आहे. वाळूच्या धंद्यात 'व्यवस्थे'तल्या किती लोकांची वाहने आहेत? राजकारणातल्या कोणाकोणाची वाहने आहेत? हे समोर आले तर या धंद्याचे खरेआधारस्तंभ कोण हे सहज उघड होईल, पण सारं कांहीं माहित असतानाही हे समोर येऊ दिले जात नाही. तेच गुटख्याच्या धंद्याचे, तेच जुगार अड्डयांचे, क्लबचे. कोठे? काय? कसे? चालते याची इत्यंभूत माहिती प्रत्येक ठाण्याच्या हद्दीतील ठाणेदाराला आहेच, पण प्रश्न आहे तो कारवाई का करायची याचा, आणि मग यातूनच जेव्हा कोठेतरी मधुर असणारे संबंध काही कारणाने बिघडतात त्यावेळी असे काही कारवाईचे चित्र समोर येते आणि मग माफिया देखील मुजोरपणाने वागतात. पण व्यवस्थेला खिशात घालता येते हा विश्वास या माफियांना कोणी दिला? यावर देखील व्यवस्थेतले सारेच चिंतन करणार आहेत का?

 

मुळात गुटख्यावर कारवाई करायची तर एकच पोलीस कर्मचारी का गेला? यापूर्वी एका कारवाईत तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच गुटख्याचे पोते लपविले होते असे देखील समोर आले होतेच. या साऱ्या घटना बीड जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या लोकांमध्ये मुजोरपणा यायला व्यवस्थेतल्या लोकांचा किती सहभाग आहे याचे चिंतन व्यवस्थेने करावे आणि खरोखरच व्यवस्थेतल्या सर्वांनाच गुटखा, वाळू किंवा इतर दोन नंबरच्या धंद्यांची पाळेमुळे खोदायची आहेत का केवळ औपचारिकता पूर्ण करायची आहे याचेही उत्तर सामान्यांना मिळायला हवे.

Advertisement

Advertisement