Advertisement

मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी आरोपींसह शासनकर्त्यांवर कारवाई करा

प्रजापत्र | Saturday, 22/07/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - मणिपूर येथील हिंसाचार आणि महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी १ वाजता अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मूकमोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. हिंसाचार आणि महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासनकर्ते यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

 

सजग अंबाजोगाईकरांच्यावतीने आज दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक, राजमाता अहिल्यादेवी चौक, बस स्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मूकमोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयात आला. त्यानंतर सजग अंबाजोगाईकरांच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चात शहरातील विविध सामाजिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण, व्यापारी, वकील, विविध पत्रकार संघाचे सदस्य महिला-पुरुषा़चा मोठा सहभाग होता.

 

यावेळी राज्य व केंद्र सरकारने कारवाई न करता, गुन्हेगारांना अभय दिले. या सरकारच्या मानवी संवेदना शिल्लक राहिल्या आहेत का ? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला. हिंसाचार आणि महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासन या सर्वांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

पाच दिवस धरणे आंदोलन: 

मणिपूर येथील महिला हिंसाचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून पाच दिवस दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. आज शहरातील विविध महिला संघटनांच्यावतीने धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

Advertisement

Advertisement