केज : विहिरीवर पाणी शेंदत असताना तोल जाऊन विहिरीत पडलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथे घडली. सुबाबाई बलभीम चंदनशिव असे या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
हनुमंत पिंपरी येथील सुबाबाई बलभीम चंदनशिव ( वय ६५ ) ही महिला मंगळवारी सकाळी शेतात गेली होती. त्या पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीतून पाणी शेंदून काढीत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच बिट जमादार अमोल गायकवाड, पोलीस नाईक अशोक गवळी, सचिन अंहकारे यांनी नागरिकांच्या मदतीने आणि बाजाच्या साहाय्याने तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. नवनाथ बलभीम चंदनशिव यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.