Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - भ्रम का भीती?

प्रजापत्र | Tuesday, 18/07/2023
बातमी शेअर करा

जे दिसत नाही तेच खरे राजकारण असं राजकारणाबद्दल नेहमी सांगितलं जातं. त्यामुळे राजकारणात नेहमीच केवळ समोर दिसणाऱ्या घटनांवरून अंदाज काढायचे नसतात. त्यातही ज्यावेळी शरद पवारांसारख्या नेत्यांचे राजकीय चातुर्य पणाला लागलेले असेल तेव्हा तर समोर जे काही दिसतेय त्यापलीकडे देखील खूप काही होत असतेच, म्हणूनच अजित पवार गटाच्या आमदारांनी मागच्या दोन दिवसात दोन वेळा शरद पवारांची घेतलेली भेट सरळ साधी नक्कीच असणार नाही. एकतर शरद पवार आमच्यासोबत आहेत, आम्ही शरद पवारांना सांगूनच हे सारे केले आहे असा भ्रम राज्यातील जनतेमध्ये निर्माण करणे असेल किंवा अजूनही ३६ आमदारांचा जादुई आकडा अजित पवारांना जुळवणे जड जात असावे त्यामुळे उद्याची भीती हे देखील भेटींमागचे कारण असावे .

 

 

      अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड घडवून काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असण्यावर आक्षेप नोंदवून आणि आपला गट म्हणजेच राष्ट्रवादी असा दावा केला. त्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार दोन दिवसात शरद पवार यांना भेटले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही काळात पक्ष, निष्ठा असले काहीच उरलेले नाही आणि 'महाशक्ती' च्या आशीर्वादाने कोणताही राजकीय पक्ष फोडणे देखील फारसे अवघड राहिलेले नसले तरी त्या साऱ्या कृत्यांना 'राजमान्यता' आणि 'जनमान्यता' मिळविणे मात्र तितकेसे सोपे नक्कीच नाही, अजित पवार गटाची गोची होती आहे ती येथे. 

     अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका घेतली, ते थेट शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. आता सुरुवात तर केली पण निभावून न्यायचे कसे ? मुळात शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्यातून काही बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. आता पक्षात 'फूट ' ही संकल्पनाच रद्दबातल झालेली आहे. एकतर विधानसभेतील तीनचतुर्थांश गटाने दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचे किंवा आम्ही कोठेच गेलो नाही असे दाखवायचे, म्हणजे एका अर्थाने आम्ही म्हणजेच पक्ष आहोत असे दाखवायचे. शिवसेनेच्या बाबतीत किमान निवडणूक आयोगाकडे तरी एकनाथ शिंदे गटाला तसे दाखविता आले. कारण शिवसेनेतील फूटी पूर्वी विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते पद एकनाथ शिंदेंकडे होते. या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयात काय होईल ही बाब वेगळी. पण निवडणूक आयोगाने शिंदेंना दिलासा दिला. आता त्याच वाटेवरून अजित पवार गट जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट झाली त्यावेळी विधानसभेत राष्ट्रवादीचे गटनेते हे जयंत पाटील होते आणि ते अजित पवारांसोबत नाहीत तर ते शरद पवारांसोबत आहेत. तसेच शिवसेनेची घटना आणि राष्ट्रवादीची घटना यात मोठा फरक आहे. स्वतः शरद पवारांना पक्षात असे काही बंड होऊ शकते याचा अंदाज होता आणि शिवसेनेतील घटनेमुळे ते अधिक सावध झाले होते हे स्पष्टच आहे. त्यामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी हिसकावणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही आणि याची जाणीव आताशा अजित पवारांना देखील झालेली आहेच.

त्यामुळेच आता भ्रमाचे राजकारण करण्यावर या गटाचा जोर दिसत आहे. आपण जे काही केले त्याला जनमान्यता मिळवायची असेल तर 'हे सारे घडावे हे तो श्रींची (शरद पवारांची ) इच्छा' हेच अजित पवार गटाला जनतेला दाखवायचे आहे. शरद पवारांनी कितीही विरोध केला तरी अजित पवार गटाचे लोक अजूनही शरद पवारांचा फोटो वापरतात, आणि आता ते शरद पवारांची भेट देखील घेत आहेत. या भेटींमध्ये दुसरी एक किनार देखील आहेच. अजूनही अजित पवार गटाला विधानसभेतील जादुई '३६आमदार' हा आकडा गाठता आल्याचे चित्र किमान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तरी दिसलेले नाही, त्यामुळे अजूनही जे कुंपणावर आहेत, अस्थिर आहेत, त्यांना वेगळे काही भासवायचे देखील या भेटीमागचे कारण असू शकते. त्यामुळे एकतर भ्रम निर्माण करायचा आणि दुसरे म्हणजे उद्या या साऱ्या प्रकाराला जनमान्यता सहजासहजी मिळणार नाही, अशी भीती आहेच. त्या भीतीमधून देखील शरद पवार ही ओळख गमवायला अजित पवारांचा गट धजावत नाही हेच वास्तव आहे.

Advertisement

Advertisement