केज - येथील शिक्षक कॉलनी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरात कोणीच नसल्याची संधी साधून भरदिवसा एका व्यापाऱ्याचे घर फोडून रोख २ लाख ५० हजार तर ७७ हजार ५०० चे दागिने असा एकूण ३ लाख २७ हजार ५०० ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सदरील घटना दोन दिवसांपूर्वी घडलेली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भरदिवसा घर फोडीची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दिनकर शिंदे यांचे शहरात फर्निचरचे दुकान आहे. ते माल घेऊन वाशी (जिल्हा उस्मानाबाद) येथे गेले होते. त्यामुळे दिनकर यांच्या पत्नी दुकानावर होत्या तर मुलं शाळेत होती. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंड वॉल वरुन जाऊन घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आता घुसले. बेडरुम मधील कपाटातील रोख २ लाख ५० हजार रुपये आणि ७७ हजार ५०० रु. दागिने असा एकूण ३ लाख २७ हजार ५०० रु. ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दुपारी साडेतीन वाजता मुलगी घरी आली असता घराचा कुलूप कोंडा तुटलेला व दार उघडे दिसल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी दोन दिवसानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.