Advertisement

केज पोलिसांनी पकडली शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजविणारी 'कोयता' गॅंग

प्रजापत्र | Thursday, 13/07/2023
बातमी शेअर करा

 

केज - धारदार शस्त्राचा धाक दाखवून पुणे शहर आणि परिसरात दहशत माजविणारी कोयता गॅंग केज पोलिसांनी ताब्यात घेतली असून या करवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. १२ जुलै रोजी केज-बीड रोडवरील जोला सासुरा पाटीवरील राणा डोईफोडे यांच्या रेणू पेट्रोल पंपावर ॲड. प्रदीप ईतापे हे  त्यांच्या मोटार सायकलीमध्ये पेट्रोल भरीत असताना तेथे एका मोटार सायकल वर तीन अनोळखी तरुण आले त्यांनी ॲड. प्रदीप ईतापे यांना लातूरला जाण्याचा रस्ता विचारला आणि त्या नंतर त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची झाली. ॲड. प्रदीप ईतापे यांनी ही माहिती केज पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व त्यांचे सोबत पोलीस नाईक शमीम पाशा आणि वाहतूक शाखेचे नितीन जाधव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी त्यांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतले असता त्यांच्याकडून एक धारदार कोयते आणि स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ताब्यात घेतली. त्यांची अधिक चौकशी केली असता ते तिघे यशवंत कुमार उत्तम लोधी (रा. सोमेश्वरवाडी सावरकर पार्क पाषाण पुणे), गणेश एकनाथ मनाळे (रा. जवान शेख भट्टी, कुमार शांती निकेतनच्या बाजूला बालाजी चौक पाषाण, पुणे) आणि विशाल राजाभाऊ कांबळे (रा. एकनाथ नगर, पाषाण पुणे) हे असल्याचे निष्पन्न झाले. 

 

 

 

'ती कोयता गॅंग' असल्याचे पुणे पोलिसांनी केले स्पष्ट 
पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांनी पुणे एलसीबी शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही कोयता गॅंग असून त्यांनी पुणे शहर आणि परिसरात धारदार शस्त्र आणि कोयत्याची धाक दाखवून अनेक गुन्हे केले आहेत. 
या प्रकरणी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांच्या विरुद्ध दि. १३ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement