किल्लेधारुर - तेलगाव कडून धारुर कडे येत असलेल्या दुचाकीला आंबेवडगाव (ता.धारुर) जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना आज बुधवारी ( दि. १२ ) दुपारी घडली आहे.
पंडित सुतारे ( वय ३८ वर्ष ) , अनिल अडागळे दोघे रा. झरी ( ता. सेलु जि. परभणी ) असे मयतांची नावे आहेत. हे दोघे झरी येथून दुचाकीवरून तेलगाव कडून धारुरच्या दिशेने येत होते. दरम्यान ते आंबेवडगाव ( ता. धारुर ) जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे ते दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने जबर मार लागला. यामध्ये पंडित सुतारे यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल अडागळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
गंभीर जखमी असल्याने येथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले. अंबाजोगाई येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. धडक दिल्यानंतर हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना यांना मदत करण्या ऐवजी तो वाहन चालक फरार झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनीही जखमींना मदत न करता बघ्याची भूमिका घेतली.