केज - आषाढी वारी वरून परतणाऱ्या टेम्पोचा आणि केजकडून कळंबकडे जाणाऱ्या दुचाकीचा केज कळंब रोडवरील माळेगाव नजीक अपघात झाला असून यामध्ये दुचाकी वरील एका महिलेसह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
आषाढी एकादशी झाल्यानंतर वारकरी मोठ्या प्रमाणावर परतीच्या प्रवासात असतात. वेगवेगळ्या वाहनाने वारकरी आपल्या गावाकडे जात असतात. त्यानुसार एका टेम्पोमध्ये भरून काही वारकरी आपल्या गावी निघाले असता सदरील वारकऱ्यांचा टेम्पो केज कळंब रोडवरील माळेगाव जवळ आला असता कळंबकडे जाणाऱ्या दुचाकीचा आणि टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील एका महिलेसह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक कचरे राहणार लिंबगाव तालुका आंबेजोगाई व द्रौपदी भोसले राहणार उमरगा असे जखमींचे नावे असून दुचाकी चालकाचा पाय मोडला आहे तर महिलेच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे.
सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आणि पायलट मकरंद घुले आणि ॲम्बुलन्सच्या डॉक्टर जगदीश वैष्णव यांनी जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.परंतु दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत.