Advertisement

केज तालुक्यात कांही भागात पावसाची तुफान बॅटिंग

प्रजापत्र | Saturday, 24/06/2023
बातमी शेअर करा

 

केज दि.२४ - जून महिना संपत आला तरी वरून राजाने डोळे वटारलेले होते. शेतकरी चातकाप्रमाणे पेरणीसाठी पावसाची वाट बघत बसलेला होता. आणि थोड्याशा विलंबाने होईना केज तालुक्यामध्ये वरून राजाने हजेरी लावली.

शनिवारी सायंकाळी केज तालुक्यातील माळेगाव, साळेगाव परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली. आणि पहिलाच पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पेरणीसाठी शेतकरी मागच्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर आज पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केज तालुक्यात काही भागांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केल्याने शेतकरी वर्गामध्ये तसेच इतरही नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील माळेगाव, मांगवडगाव, साळेगाव, सुर्डी सोने सांगवी या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतामध्ये अक्षरशः पाणी साठले आहे. तर काही ठिकाणी तर शेतामधील विहिरी पहिल्याच पावसाने भरून विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे अशाच प्रकारचा पाऊस अन्य भागात ही लवकरात लवकर होण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे. मागच्या काही दिवसांपासून बी बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होता. पेरण्या खोळंबल्या होत्या आणि जास्त दिवस पावसाने जर आखडले तर पेरण्यावर काही विपरीत परिणाम होतो की काय अशी भीती निर्माण होऊ लागलेली होती. हवामानाचे अंदाज जरी काही ठिकाणी खरे होत होते तरी अनेकवेळा पावसाचे अंदाज हे खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झालेली होती. मात्र आज केज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वरून राजा भर असल्याने तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
               दरम्यान, पहिल्याच पावसाने पेरण्या सुरू होणार नसल्या तरी सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनासह समस्त नागरिक सुखावले आहेत.

Advertisement

Advertisement