Advertisement

'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'

प्रजापत्र | Saturday, 03/06/2023
बातमी शेअर करा

परळी - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. सकाळपासून गोपीनाथ गडावर गर्दी झाली आहे. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केल्यानंतर आमदार धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष व विविध निवडणुकीतील आठवणींचा आज कल्लोळ निर्माण झाला आहे. बॅनरवरील त्यांचे फोटो पाहून वेगवेगळ्या सभा व त्यांचे भाषण आठवत होते. कोणत्या सभागृहात कोणते भाषण केले व कुठल्या कार्यक्रमात तलवार घेतली होती हे फोटो पाहून तीव्र आठवणी दाटून आल्या. गोपीनाथराव मुंडे यांचा खूप सहवास लाभला आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आठवणी आपल्यात राहतील असे धनंजय मुंडे म्हणाले. यासोबतच मुंडे यांनी सोशल मीडियातून 'अप्पा... लोकसेवेचे व्रत आणि वसा तुमच्याकडूनच मिळाला आणि तो निभावण्यासाठी सदैव वचनबद्ध राहीन.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची  तयारी करण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी  राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. गोपीनाथ गडावर दुपारी १ ते ३ वा. दरम्यान  रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Advertisement

Advertisement