अंबाजोगाई - सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यावेळी 24 जुगाऱ्याना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 12 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जुगार मालकासह 25 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा येथे पाशा चौधरी, रहेमान सुलेमान हे आपले स्वतःचे फायद्या करिता बेकायदेशीररित्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या बंद रूममध्ये जन्ना मन्ना (अंदर बहार) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी छापा मारला असता यावेळी 24 जुगारी आढळून आले. जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी असा 12 लाख 17 हजार 600 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. जुगारमालकासह 25 आरोपीवर पोहे.राजू वंजारे यांच्याफिर्यादवरून अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, गोविंद मुंडे, चालक शिंगारे, अंबाजोगाई शहरचे उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी केली.