Advertisement

नैराश्यातून केली आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 22/05/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर - साठवण तलावात आढळून आलेल्या प्रेताची ओळख पटली असून संजय मुरलीधर वावधने (वय 48) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत इसम गेल्याकाही दिवसांपासून बेपत्ता होता. नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.  

धारुर शहराच्या पश्चिमेस बालाघाट डोंगर रांगेत पंचवीस वर्षांपूर्वी बांधलेल्या साठवण तलावात आज (दि.२२) मे सोमवार रोजी सकाळी पाण्यात पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले.  धारुर किल्ल्याच्या पाठीमागील डोंगरात शहराच्या जवळ असलेल्या या तलावावर अनेक जण  सकाळी नित्यनियमाने पोहोण्याचा आनंद घेतात. यापैकी काहींच्या निदर्शनास प्रेत आढळून आल्यानंतर शहरात याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर पोलीसांनी  शहानिशा केल्यावर घटनेचा पंचनामा केला. तपासानंतर सदर प्रेत हे शहरातील जोडआड गल्लीत राहणाऱ्या संजय मुरलीधर वावधने (वय 48) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. सदर इसम गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. नैराश्यातून त्याने साठवण तलावात स्वतःला झोकून देवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement