पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 तारखेला 862 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. पण आता काँग्रेस नेते राहुल गांधी यावर आक्षेप घेतला आहे.राहुल गांधी रविवारी एका ट्विटमध्ये म्हणाले की, संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावे. केवळ राहुलच नाही तर काँग्रेस पक्षानेही मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यावर आक्षेप घेतला आहे.
विरोधी पक्षाच्या मते, 28 मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे, त्यामुळे त्या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा देशाच्या संस्थापकांचा अपमान आहे.सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली ही इमारत पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तिचे बांधकाम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले. त्यानंतर अवघ्या 28 महिन्यांतच ही इमारत पूर्ण झाली. संसदेची नवी इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस फूट मोठी आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होते बांधकाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल तेव्हा संसदेच्या नव्या इमारतीपेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही. 15 जानेवारी 2021 रोजी त्रिकोणी आकाराच्या नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले. हे बांधकाम गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होते. पण त्याला आता 6 महिन्यांचा विलंब झाला आहे.
4 मजली इमारत, भूकंपाचा परिणाम होणार नाही
संसदेची जुनी इमारत 47 हजार 500 चौरस मीटरमध्ये, तर नवी इमारत 64 हजार 500 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. म्हणजेच नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी आहे. नवे संसद भवन 4 मजली आहे. त्याला 3 दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार व कर्म द्वार अशी नावे आहेत. खासदार व व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. इमारतीवर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग व मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. त्याचे शिल्पकार बिमल पटेल आहेत.
नव्या इमारतीची गरज का भासली?
सध्याचे संसद भवन 96 वर्षांपूर्वी 1927 मध्ये बांधण्यात आले होते. मार्च 2020 मध्ये सरकारने संसदेत सांगितले की, जुनी इमारत खराब होण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या नव्या परिसीमनानंतर वाढणाऱ्या खासदारांना बसण्यासाठी जुन्या इमारतीत पुरेशी जागा नाही. यासाठी नवीन इमारत बांधण्यात येत आहे.