Advertisement

मिक्सर – दुचाकीचा अपघात

प्रजापत्र | Thursday, 13/04/2023
बातमी शेअर करा

केज - केज - मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी ) जवळील पुलाजवळ एचपीएम कंपनीच्या मिक्सरने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
            केज तालुक्यातील येवता येथील नामदेव रघुनाथ साखरे ( वय २५ ) या तरुणाने मागील काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पिकअपचे कागदपत्रे आणण्यासाठी तो १२ एप्रिल रोजी सकाळी बीडला गेला होता. काम आटोपून नामदेव साखरे व कल्याण धनराज डोंगरे ( रा. कोठी ता. केज ) हे दोघे दुचाकीवरून ( एम. एच. ४४ व्ही. ३०५३ ) गावाकडे येत होते. केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी ) जवळील पुलाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीच्या मिक्सरने ( एम. एच. १५ एफ. व्ही. ५१५६ ) जोराची धडक देऊन मिक्सर हा रस्त्याच्या एका बाजूला खाली पलटला. या अपघातात दुचाकीवरील नामदेव रघुनाथ साखरे व कल्याण धनराज डोंगरे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नामदेव साखरे या पाय मोडलेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर कल्याण डोंगरे याचा हात मोडला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
            दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जमादार अशोक मेसे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Advertisement

Advertisement